धाराशिव: उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीकडून कैलास घाडगे-पाटील तर महायुतीकडून अजित पिंगळे लढणार आहेत. दरम्यान भाजपाचे तालुकाध्यक्ष असलेले पिंगळे यांना शिवसेने कडून (शिंदे गट) उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे उस्मानाबाद-कळंब मतदारसंघासाठी मंगळवारी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होण्याचे संकेत असून उमेदवार अजित पिंगळे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सावंत परिवारामुळे सुरू झाला आहे. विकास करण्याची धमक फक्त सावंत परिवारामध्येच असून उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाची उमेदवारी धनंजय सावंत यांना देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र श्री सावंत यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने समर्थक व कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.
उस्मानाबाद कळंब मतदार संघात ठाकरे गटाचे कैलास पाटील व शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यामध्ये बिग फाईट होणार आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष असलेल्या अजित पिंगळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याने इच्छुकांसह शिवसैनिकांमध्येही नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. आता या उमेदवारीचे पडसाद मोठ्या प्रमाणात पडत असून बंडखोरी उफाळून येत आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदचे माजी लोकप्रिय उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी गत अनेक महिन्यांपासून पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील होते. याच मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला शेतकरी सहकारी साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहामुळे सुरू झाला आहे. भूम परंडा वाशी प्रमाणे उस्मानाबाद कळंब मतदार संघाचा विकास करायचा असेल तर धनंजय सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पुढे येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही धनंजय सावंत यांनाच उमेदवार द्यावी यासाठी मोठा पाठपुरावा सुरू होता. मात्र अचानक भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अजित पिंगळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने इच्छुकांसह शिवसैनिकाचा ‘मूड ऑफ’ झाल्याचे म्हटले जात आहे. धनंजय सावंत यांनी गत अनेक महिन्यांपासून या मतदार संघात तयारी सुरू केली होती. तेरणा कारखान्यावर स्नेह मेळावा घेऊन त्यांनी विधानसभेची पेरणी सुरू केली होती. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असून त्यांनी धनंजय सावंत यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता सावंत हे या मतदार संघातून मंगळवारी अपक्ष उमेदवारी दाखल करून आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्येच फूट पडत असल्याने उमेदवार पिंगळे यांना मोठे आव्हान मानले जाते.आता सावंत उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात? हे पहावे लागणार आहे.