
धाराशिव: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. दिपाली अरुण यादगिरे आणि श्री. सुजीत दिपकराव साळुंके यांच्या प्रचारासाठी ही रॅली युवा नेतृत्व मल्हार (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. स्वतः मल्हार पाटील यांनी ग्राउंडवर उतरून उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून, प्रचार रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रॅलीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी गरजा आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी स्थानिक विकासाविषयी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. या रॅलीत श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन भोसले, श्री. युवराज नळे, श्री. अमरसिंह देशमुख, श्री. संदीप साळुंके, श्री. सुजीत साळुंके, श्री. आशिष पाटील तसेच महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण कार्यक्रम आचारसंहितेचे पालन करून पार पडला असल्याची माहिती आयोजकांनी दिली. धाराशिव शहरात निवडणूक प्रक्रिया जोमात सुरू असून विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचे प्रचार उपक्रम सुरू आहेत. नागरिकांचा वाढता सहभाग आणि शांततेत होणारे कार्यक्रम यामुळे निवडणूक प्रक्रिया सुशोभित आणि सुरळीत पार पडत आहे.


