

अजित पवारांची थेट साथ; मंजुषा साखरेंच्या मैदानात उतरल्यानं धाराशिवची समीकरणे हलली!
धाराशिव: धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने शनिवारी प्रचंड ‘पावर शो’ करत अधिकृत उमेदवार ॲड. मंजुषा साखरे यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांची थेट उभी राहिली आहे. तुळजापूर येथे घेतलेल्या भेटीत दादांनी साखरे यांचे उघडपणे कौतुक करत “सुशिक्षित, सक्षम आणि धाराशिवचा योग्य चेहरा पक्षाला मिळाला” असे म्हणत मजबूत पाठबळ दिले. तुळजापूर येथे अधिकृत उमेदवार मंजुषा साखरे यांनी उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादीच्या उच्च नेतृत्वाच्या या ‘डायरेक्ट सपोर्ट’मुळे निवडणूक समीकरणे हलू लागली असून भाजपाच्या छावणीतही खळबळ माजल्याची चर्चा आहे.
धाराशिव शहरात साखरे यांचा दमदार जनसंपर्क, अभ्यासू प्रतिमा आणि महिला नेतृत्वाचा ठसा असल्याने त्यांची उमेदवारी आधीच चर्चेत होती. त्यात आता अजित पवारांची साथ जोडल्याने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उफाळून आला आहे. तुळजापूरमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान दादांनी “धाराशिवला सुशिक्षित आणि सक्षम नगराध्यक्ष म्हणून आपल्याला उमेदवारी दिली आहे. पक्ष तुमच्या सोबत घट्ट उभा आहे,” अशी स्पष्ट ग्वाही दिल्याचे सूत्र सांगतात. या संकेतामुळे राष्ट्रवादीची मोहिम आक्रमक मोडमध्ये गेली आहे. या भेटीला जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे, शहराध्यक्ष सचिन तावडे, विधानसभा अध्यक्ष मोहन मुंढे, जिल्हा कार्याध्यक्ष माशायक, असद पठाण, खलील पठाण, जगताप साहेब तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.


