Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

चला फटाके मुक्त दिवाळी साजरी करू

*निर्धार करूया फटाके मुक्त दिवाळी साजरी करु या*

दिवाळी म्हटलं की आनंद, उजळणारा दिवा, रंगीबेरंगी आकाशकंदिल, फराळाचा गोडवा आणि घराघरातून निघणारा मंगल सुगंध असं एक सुंदर चित्र डोळ्यासमोर येतं. पण गेल्या काही वर्षांपासून दिवाळीला फटाक्यांशी जोडलं गेलंय. आता ह्या फटाक्यांच्या आवाजाने, धुराने साजरं होणारं हा सण खरंच आनंद देतो का हे विचारण्याची गरज वाटते. गावात बरेच जण फटाके उडवायला आवडतात. लहानथोर आनंदाने धुर, आवाज ह्या सगळ्यात रममाण होतात. पण ह्या फटाक्यांच्या फुगार्‍याखाली काही प्रश्न दडलेत.

फटाके उडवताना निसर्गाला आणि आपल्यालाही अपाय होत असतो, हे थोडं कळलं पाहिजे. फटाक्यांतून निघणारा धूर हवेचं प्रदूषण करतो. आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बघतो की, हवेचा रंग अगदी बदललेला असतो. श्वास घ्यायला अवघड होतं, अस्थमाचे, श्वासाचे आजार बळावतात. खास करून लहान मुलं आणि वृद्धांवर ह्याचा जास्त परिणाम होतो. फटाके फोडायचा आनंद काही वेळाचा, पण ह्या सणानंतर पर्यावरणावर जो ताण येतो, तो फार मोठा असतो.

आता काही जण म्हणतील, फटाके म्हणजे मजा, आनंद. पण आनंदाचा हा प्रकार कसा? फटाके फोडून आनंद मिळतो, पण फटाक्यांमुळेच कित्येकांच्या घराचं माणूस, पाळीव प्राणी, पक्षी भयभीत होतात. आवाजाचा प्रदूषणामुळे लोकांना त्रास होतो. काही घरात लहान मूलं भीतीने घाबरतात. माणसांनी आपल्यासोबत राहणाऱ्या प्रत्येकाचा विचार करून सण साजरा करावा, त्यातच खरं समाधान मिळतं.

आता फटाके उडवायला एवढे पैसे खर्च करतो. पण ते पैसे जर गरजूंना मदत करायला, गोडधोड बनवायला किंवा घराला सजवायला वापरले, तर तो आनंद जास्त चिरकाल टिकणारा ठरेल. फटाके मुक्त दिवाळी म्हणजे साधी आणि सजीव उत्सव. आपली परंपरा दिव्यांशी जोडलेली आहे. तेलाचे दिवे लावून अंधाराला दूर करणं, घर स्वच्छ ठेवणं, लखलखतं सजवणं, रंगोळी काढणं ही खरी आपली दिवाळी आहे.

फटाके मुक्त दिवाळीचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली संस्कृती आणि पर्यावरणाचं रक्षण करणं. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला, स्वच्छ आणि शांत वातावरण देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांना निसर्गाची महत्ता समजावून दिली पाहिजे. दिवाळीचा अर्थ समजावून दिला पाहिजे की, हा सण फक्त धुर, आवाज आणि गोंधळाचा नाही तर प्रेम, एकोपा, परंपरा, आणि माणसांचे नाते जपणारा आहे.

तेंव्हा ह्या वर्षी ठरवूया, फटाके न उडवता एक सुंदर, साधी, आणि शांत दिवाळी साजरी करूया.

प्रविण जरीचंद माळवदे

-मो नं -8605531199

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी