धाराशिव: उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेत बंडखोरीचे संकेत मिळत असून विधानसभेसाठी इच्छुक तथा विद्यमान जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे मंगळवारी (दि.२९) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्री पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने इच्छुकांसह शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे साळुंखे यांच्या बंडखोरीचा पिंगळे यांना मोठा फटका बसू शकतो.
उस्मानाबाद-कळंब मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण ? याचे गुराळ गत अनेक दिवसांपासून सुरू होते. वेगवेगळी नावे समोर येत होती. उमेदवारीसाठी इच्छुकांनी वर्षा बंगल्यावर ठाण मांडले होते. मात्र इच्छुकांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेकडून (शिंदे गट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जुने शिवसैनिक अजित पिंगळे यांना अचानक उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातील इच्छुकांचा विचार न करता भाजपात कार्यरत असलेले पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी उफाळून येण्याची दाट शक्यता असून पहिली ठिणगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे हे उमेदवारी अर्ज रूपाने टाकणार आहेत. श्री साळुंखे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच आपण उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे साळुंखे यांची बंडखोरी महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असून कोण कोण बंडखोरी करणार? हे पाहावे लागणार आहे.