Wednesday, January 28, 2026

Epaper

spot_img

“रिलस्टार बाळ” म्हणत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर  टीका


माझ्यावर आणि माझ्या परिवारावर टीका करणे हेच यांचं काम, रील स्टार बाळ हे विसरतात की आपण लोकप्रतिनिधी आहोत?

धाराशिव: निवडणुकीच्या धगधगत्या वातावरणात भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भाषणे अधिक धारदार होत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर “रीलस्टार बाळ” अशी कानगोष्टी करणारी उपाधी देत जोरदार फटकारले. “लोकप्रतिनिधी होऊन जबाबदारी घ्यावी लागते. पण काही जणांना सोशल मीडियावरचे रील महत्त्वाचे वाटतात. माझ्यावर आणि परिवारावर टीका करण्याशिवाय दुसरे काही काम उरलेलं नाही का?” असा सवाल करून आ. राणा दादांनी खा. ओमराजेंवर कडाडून हल्ला चढवला.

शहरातील एका जंगी प्रचार सभेत बोलताना आमदार पाटील यांनी ओमराजेंच्या राजकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ताशेरे ओढले. ते म्हणाले,
“माझ्यावर आणि माझ्या परिवारावर टीका करणे हेच यांचं काम झालं आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोलायला नको, पण सोशल मीडियावर रील्स करणं मात्र आवडतं. म्हणूनच मला म्हणावं लागतं—‘रीलस्टार बाळ’ विसरतात की ते लोकप्रतिनिधी आहेत.” या विधानानंतर सभा टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेली. आमदार पाटील यांनी ओमराजेंच्या शैलीवर आणखी घणाघात करत सांगितले,
“मी प्रकल्प उभे करतो, निधी आणतो, विकासासाठी दिवस–रात्र फिरतो. पण हे मात्र माझ्या कुटुंबावरच हमखास टीका करतात. धाराशिवकरांनी या ‘वैयक्तिक टीका विरुद्ध विकासाची राजकारण’ या संघर्षाचं नीट मूल्यमापन करावं.” असेही आ. राणा दादा म्हणाले. मतदान काही तास उरले असतानाच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर आक्रमकपणे हल्लाबोल चढविला.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष तीव्र

मतदानाची वेळ जशी जवळ येत आहे, तशी नेत्यांच्या विधानातील धार वाढत चालली आहे. भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील तणाव उफाळून आल्याची ही स्पष्ट चिन्हे आहेत. या दोन्ही नेत्यांमधील वाद जुना असला, तरी यावेळी तो अधिक उघड आणि आक्रमक स्वरूपात दिसत आहे.

‘रीलस्टार बाळ’ची जहरी टिका

शहरभरात “रीलस्टार बाळ” या उपाधीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याचे मीम्स, पोस्ट्स, व्हिडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही एकमेकांवर शब्दबाणांची मालिकाच सोडली आहे. निवडणुकीत अंतिम काही तास शिल्लक असताना या वादग्रस्त विधानामुळे राजकीय गणितावर मोठा परिणाम होईल का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी