

धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवा नेते मल्हार (दादा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठी ताकद लावली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा काकडे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वतः मल्हार पाटील मैदानात उतरले आहेत. शनिवारी (दि.२९) प्रभाग क्रमांक २० मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. विलास मारुती लोंढे आणि सौ. वंदना बापू पवार यांच्या प्रचारार्थ जोरदार पदयात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शहराचे ग्रामदैवत धारासूर मर्दिनी देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे उमेदवारांनी नागरिकांना भेटून त्यांच्या स्थानिक समस्या, गरजा आणि विकासासंबंधी सूचना जाणून घेतल्या. प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, सुरक्षा आणि दीर्घकालीन विकास आराखडा यावर नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांना उमेदवारांनी मनपूर्वक प्रतिसाद दिला. या संवाद उपक्रमात महिलांचा, ज्येष्ठांचा, स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा नियमानुसार, शांततेत सहभाग नोंदला गेला.
संपूर्ण कार्यक्रमात कोणतीही नियमबाह्य जाहिरात, प्रचार–गर्जना किंवा निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली.


