Thursday, January 29, 2026

Epaper

spot_img

धाराशिव शहराला २४ तास पाणी व आधुनिक सुविधा मिळवून देणार-आ. राणाजगजितसिंह पाटील


धाराशिव : धाराशिव शहराचा स्थिर आणि दीर्घकालीन विकास हा आमचा प्रमुख ध्यास आहे. उजनी पाणीपुरवठा योजना, रस्ते सुधारणा, बागबगीचे, पर्यावरणपूरक उपक्रम अशा अनेक प्रकल्पांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या पाठबळामुळे गती मिळणार आहे. नागरिकांना २४ तास स्वच्छ पाणी आणि आधुनिक सुविधा देणे हे आपल्या कार्यसंस्कृतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रभाग ८ मधील उमेदवारांनी घेतलेली विकासशील भूमिका आणि नागरिकांशी थेट संवाद ही धाराशिवच्या प्रगतीसाठी महत्त्वाची पायरी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचे सहकार्य आणि आशीर्वाद हेच आमचे बळ असल्याचे प्रतिपादन भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग ८ च्या उमेदवार सौ. किरण ईश्वर इंगळे आणि श्री. युवराज वीरसेन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आ. राणा दादा यांनी गवळी गल्ली परिसरात कॉर्नर बैठक घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात येथील प्रसिद्ध श्री बाल हनुमान गणेश मंडळ येथे आरती करून झाली. उमेदवारांनी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर गणेश मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. भालचंद्र हुच्चे सर, श्री. संतोष हंबीरे आणि सहकाऱ्यांशी शहराच्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. पुढे बोलताना राणा दादा म्हणाले, कधीकाळी १०० टँकरवर अवलंबून असलेल्या धाराशिव शहराला राज्य आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने उजनी पाणीपुरवठा योजना मिळवून देण्यात यश आले आहे. आता धाराशिवकरांना २४ तास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीच्या माध्यमातून आकर्षक बागबगीचे निर्मिती, वृक्षलागवड आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा नगरपालिका पुढाकार घेणार असल्याचेही सांगण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार धाराशिव तयार करण्यावर भर दिला जात आहे. लवकरच धाराशिव हे मुबलक पाणी, बागबगीचे आणि आधुनिक सुविधा असलेले विकसित शहर म्हणून राज्यात आणि देशात ओळखले जाईल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. धाराशिवच्या विकासकामांना वेग देण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना जनतेने बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहनही करण्यात आले. या प्रसंगी श्री. राजसिंह राजेनिंबाळकर, युवराज राजेनिंबाळकर, श्री. राहुल काकडे, श्री. प्रवीण पाठक, श्री. कुणाल निंबाळकर, श्री. राम मुंडे, श्री. प्रसाद मुंडे, श्री. बाळासाहेब खांडेकर, श्री. प्रवीण शिरसाट यांच्यासह गवळी गल्ली आणि सोनार लाईन येथील व्यापारी बांधव उपस्थित होते.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी