हिंगोली जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची नियुक्ती 

हिंगोली: राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक तथा धाराशिव जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी मंगळवारी (दि.१५) नियुक्तीचे आदेश जारी केले असून या नियुक्तीबद्दल श्री गुप्ता यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली झाली होती. त्यांना कल्याण डोंबवली महानगर पालिका आयुक्तपदावर पदस्थापना देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी ८ एप्रिल रोजी शासनाने काढले होते. परंतु त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. अखेर हिंगोली जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी मिळाले असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक राहूल गुप्ता यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले गुप्ता यांनी आयआयटी रोपार, पंजाब येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांमध्ये गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, धाराशिव येथील जिल्हा परिषदेचे सीईओ व एमएसईडीसीएलचे संचालक यांचा समावेश आहे. श्री गुप्ता यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना उत्कृष्ट कामगिरी करत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले होते. या उपक्रमाची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली होती. आता गुप्ता हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.