पालकमंत्री सरनाईकांची माणुसकी: अपघातग्रस्त तरूणासाठी आले धावून
मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. मुंबईतील घाटकोपर फ्लायओव्हरवर शुक्रवारी (दि. १० एप्रिल) रोजी संध्याकाळी एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वार पाहून राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले.
मंत्री सरनाईक यांनी अपघातग्रस्ताची विचारपूस केली, त्याला उभं केलं आणि तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था करून एक संवेदनशील भूमिका बजावली. यावेळी त्यांनी सांगितले, “मंत्री म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून मदतीचा हात दिला. माणुसकी हीच खरी ओळख असते.” घटनास्थळी उपस्थित लोकांमध्येही त्यांच्या या वागणुकीमुळे एक सकारात्मक संदेश गेला. अनेकांनी त्यांच्या तत्परतेचे आणि माणुसकीच्या भावनेचे कौतुक केले आहे.