मनसेचे देवदत्त मोरेंकडून भेटी-गाठींवर भर; संवाद दौऱ्यास मोठा प्रतिसाद
विजयी करून काम करण्याची संधी देण्याचे आवाहन
धाराशिव: उस्मानाबाद-कळंब मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार देवदत्त मोरे यांनी जोरदार फिल्डिंग लावत प्रचार सुरू केला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात जाऊन श्री मोरे तरुण, महिलांसह ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे मनसेची ताकद वाढत असून मोरे यांच्या संवाद दौऱ्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. तिसरा पर्याय म्हणून मोरे यांचा विचार होऊ शकतो. धाराशिवसह कळंब तालुक्यात देवदत्त मोरे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे इंजिन या चिन्हावर बटन दाबून विजय करावे, असे आवाहनही ते करत आहेत.
उस्मानाबाद- कळंब मतदार संघाची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. महाविकास आघाडीकडून कैलास पाटील तर महायुतीकडून अजित पिंगळे आखाड्यात उतरले आहेत. दुरंगी वाटणारी ही निवडणूक मनसेच्या देवदत्त मोरे यांच्यामुळे तिरंगी झाल्याचे म्हटले जात आहे. पहिल्यांदाच मोरे यांनी मनसेच्या इंजिनावर स्वार होत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योगपती असलेले मोरे यांनी गत अनेक वर्षांपासून धाराशिवसह कळंब तालुक्यात विविध महापुरुषांच्या जयंती, समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून संपर्क वाढविलेला आहे. याच मतदार संघातील कसबे तडवळ हे देवदत्त मोरे यांचे गाव असून त्यांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही आपला जलवा दाखवून दिला होता. अनेकांना त्यांनी राजकारणात सक्रिय करून विविध पदावर बसण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली होती. आता मोरे यांनी थेट उस्मानाबाद-कळंब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले असून महाविकास आघाडीसह महायुतीसमोर आव्हान उभा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे मतदारसंघात मोरेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून ग्रामस्थांमधून मोठा प्रतिसाद लाभत आहे. धाराशिव येथील विविध संघटनेच्या तरुणांनी व ग्रामस्थांनी मनसेचे उमेदवार देवदत्त मोरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देवदत्त मोरे विधानसभा निवडणुकीत कोणाला धक्का देणार? याकडे मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. दरम्यान मोरे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बळकटी मिळाल्याचे म्हटले जात आहे.