*शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले महायुती सरकार हटवा – आ. कैलास पाटील*
कळंब: महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात वाठवडा, ता. कळंब येथे झालेल्या कॉर्नर सभेत मतदारांना उद्देशून जोरदार आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचे म्हटले आणि विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणत महायुती सरकारवर तीव्र टीका केली.
आ. पाटील म्हणाले, “पहिले अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, परंतु त्यातील दोन वर्षे कोविडच्या संकटात गेली. त्यामुळे आम्हाला फक्त सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्या कालावधीत देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर सत्तेवर आलेले महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवून केवळ राजकीय फायद्यासाठी धोरणे आखली आहेत.”
शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकत त्यांनी पुढे म्हटले: “महायुती सरकारने केलेली वचनबद्धता फोल ठरली आहे. शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येत अडकवले आहे, हमीभावाच्या नावाखाली शेतमालाची विक्री ठप्प झाली आहे, आणि पिकविम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, आणि सरकार शेतकऱ्यांना आधार देण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे.”
महाविकास आघाडीच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत, आ. पाटील म्हणाले: “महाविकास आघाडीने जेव्हा सत्तेत होते, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलली होती. कोविड काळात देखील आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली आहे. यामुळे आज शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन
“महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेची संधी दिल्यास, आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करू. पिकविमा योजना पुन्हा सक्षमपणे राबवू, शेतमालाला चांगला दर मिळवून देऊ, आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढू. वाठवडा गावातील समस्यांवर विशेष लक्ष देत शेतकऱ्यांना हक्काचे जीवनमान उभे करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
आ. कैलास पाटील यांच्या या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित त्यांच्या या भाषणाने मतदारसंघात चर्चेला नवीन दिशा दिली आहे. यावेळी रामलिंग आव्हाड, अण्णासाहेब तनमोर, बिभीषण देशमुख, भारत इरपतगिरे, हनुमंत साळुंखे, बालाजी आल्टे, नारायण गवळी, काका राऊत, विजय इंगळे, वकील पठाण, अमृत टेकाळे, आकाश पवार, सल्लाउद्दीन बेग , फकीर सय्यद, संदेश पवार, बाप्पा येवनकर, खंडू आल्टे, अमित आल्टे, राजाभाऊ आल्टे आदी उपस्थित होते.