धाराशिव: उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुरज साळुंखे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी (दि.३०) भेट घेऊन कार्य अहवाल सुपूर्द केला. तसेच जरांगे-पाटील यांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे श्री साळुंखे यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले सुरज साळुंखे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार होते. त्यांनी गत अनेक महिन्यांपासून उस्मानाबाद – कळंब मतदारसंघात मोर्चेबांधणी करून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी लावून धरली होती. ज्यावेळी शिवसेनेचे दोन गट पडले. त्यावेळी सुरज साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने शिंदे गटाची ताकद अत्यल्प असतानाही श्री साळुंखे यांनी कार्यकर्ते जमवून पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला. एक आक्रमक नेतृत्व असलेल्या सुरज साळुंखे यांनी शिंदे गटाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारल्याने श्री साळुंखे प्रचंड नाराज झाले . त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तसेच हा उमेदवारी अर्ज कायम ठेवणार असून आता माघार नाही तर लढणार आणि जिंकणार असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. बुधवारी रात्री अपक्ष उमेदवार सुरज साळुंखे यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. तसेच आपला कार्य अहवालही मनोज दादांकडे सुपूर्द करून विविध विषयावर चर्चा केली. आपण मराठा समाजाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून आपण उमेदवारी द्यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. आता उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? हे पाहणे औचिक्याचे ठरणार आहे.