

धाराशिव: धाराशिव शहरातील बौद्धनगर परिसरातील शांतीसागर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे असलेल्या मतदान केंद्राला जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी आज भेट देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची पाहणी केली.
दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रातील मतदान यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था, नागरिकांची ये-जा, विशेष सुविधा आणि निवडणूक आचारसंहितेचे पालन यांचा आढावा घेतला. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदारांनी निर्धास्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी केले. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सुरक्षा पथकांशी संवाद साधत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनधिकृत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न त्वरित रोखावा, अशा सूचना दिल्या. दरम्यान, सकाळपासून मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून येत असून मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


