
धाराशिव: नगरपालिका निवडणुकीचा धुराळा चढत असताना धाराशिवमध्ये भाजपात मोठी ‘भरती’ सुरू आहे. शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचा मार्ग फक्त भाजपाच दाखवू शकतो, या विश्वासातून ठाकरे गटातील (उबाठा गट) अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. आमदार राणादादा यांच्या हस्ते झालेल्या या प्रवेशामुळे भाजपाच्या स्थानिक संघटनाला मोठे बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटली.
प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये श्री. अजित भोसले, श्री. निश्चित राठोड, श्री. माणिक राठोड, श्री. अमोल बोंदर, श्री. पवन यमपुरे, श्री. दादा पंडागळे, श्री. औदुंबर आगलावे यांचा समावेश आहे. तसेच झोरे गल्ली (प्रभाग १२), प्रभाग १९, प्रभाग १ आणि प्रभाग ७ मधील तब्बल दोन डझनहून अधिक युवक कार्यकर्त्यांनी भाजपावरचा परिपूर्ण विश्वास व्यक्त करत कमळ हाती घेतले. या प्रवेशामागे श्री. दिनेश बंडगर यांचा विशेष समन्वय उल्लेखनीय ठरला. कार्यक्रमास श्री. दत्ताभाऊ बंडगर, श्री. प्रल्हाद धत्तुरे यांसह भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशपूर्ण घोषणा आणि उत्साहात हा प्रवेश उत्सव संपन्न झाला. भाजपात झालेला आजचा हा प्रवेश केवळ औपचारिकता नसून धाराशिवकरांच्या मनातील वाढता विश्वास, विकासाचा ठाम निर्धार आणि महायुती सरकारच्या नेतृत्वावरील स्वीकृतीचे द्योतक असल्याचे आमदार राणादादा यांनी सांगितले. धाराशिवचा सर्वांगीण विकास महायुती सरकारसोबतच शक्य असल्याचे प्रतिपादन करत, “कमळ चिन्हावर बटण दाबा आणि धाराशिवला प्रगतीच्या महामार्गावर आणा,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


