धाराशिव: तालुक्यातील गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या गणामधून भारतीय जनता पार्टीकडून सुशिक्षित व तरूण चेहऱ्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील व विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ते रामलिंग भालेराव यांचे चिरंजीव पंकज भालेराव यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत आहे. गावातील तरुणाईपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांच्या चर्चेत असलेलं हे नाव स्थानिक राजकारणात नवा शंख नाद फुंकण्याच्या तयारीत आहे. वडिल रामलिंग भालेराव यांचा राजकीय वारसा घेऊन पंकज भालेराव यांनी मैदानात उतरण्याची मागणी आता पुढे येत आहे.
धाराशिव तालुक्यात कायम चर्चेत आणि लक्षवेधी पंचायत समितीचा मतदार संघ म्हणून गोवर्धनवाडी मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघातील लढती या कायम चुरशीच्या ठरल्या आहेत. या मतदारसंघात गोवर्धनवाडीसह थोडसरवाडी, तुगाव, रूई-ढोकी, कावळेवाडी आणि जय भवानी नगर (ढोकी) या गावांचा समावेश आहे. यावेळी हा मतदारसंघ एससी (अनुसूचित जाती पुरूष) प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या गणात भारतीय जनता पक्षाकडून पंकज भालेराव यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. पंकज भालेराव हे माजी पंचायत समिती सदस्य आणि गोवर्धनवाडीचे माजी सरपंच रामलिंग भालेराव यांचे चिरंजीव आहेत. रामलिंग भालेराव यांनी ग्रामपातळीवरील विकासकामांपासून ते संजय गांधी निराधार समितीमार्फत जनकल्याणकारी योजनांपर्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्या पावलांवर चालत पंकज भालेराव यांच्याकडे तरुण, सुशिक्षित आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. आधुनिक दृष्टीकोन, डिजिटल जाण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर पंचायत समिती स्तरावर परिवर्तन घडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. गोवर्धनवाडी गणातील मतदारसंख्या जवळपास १० हजार मतदार असून, येथे युवकांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ‘भालेराव कुटुंबाच्या सेवाभावाला तरुणाईची जोड’ हे समीकरण सध्या गावोगाव चर्चेचा विषय ठरत आहे. “भालेराव कुटुंबाचा पाया जनसेवेवर उभा आहे; आता पंकज भालेराव हे त्यावर नव्या उमेदीचा घमघमाट करणारे नेतृत्व ठरतील,” असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. पंकज भालेराव हे सुशिक्षित तरुण असून, पाटील घराण्याशी कायम एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. श्री भालेराव यांचा जनसंपर्क आणि काम करण्याची हातोटी यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून आता पुढे येत आहे. पंचायत समिती गणातून सुशिक्षित असलेल्या पंकज यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघ सर्वच बाबतीत आघाडीवर राहणार असल्याचा मतप्रवाह व्यक्त होत आहे. त्यामुळे या उमेदवारीकडे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. शिक्षण, विचार आणि सेवाभाव यांचा संगम असलेला हा तरुण आता ग्रामराजकारणात नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे. ‘विकास आणि विश्वास’ हेच सूत्र घेऊन मैदानात उतरणाऱ्या पंकज भालेराव यांच्या उमेदवारीभोवती सध्या जनतेत आणि तरुणाईत उत्सुकतेचं वातावरण आहे.
सुशिक्षित, विचारवंत आणि जमिनीवरचा तरुण
पंकज भालेराव हे गोवर्धनवाडीचे माजी सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य रामलिंग भालेराव यांचे चिरंजीव आहेत. रामलिंग भालेराव यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकास, जलसंधारण, रस्ते व जनकल्याणकारी योजनांमध्ये ठसा उमटवला. त्या पावलावर पाऊल ठेवत पंकज भालेराव ‘विकास आणि विश्वास’ या घोषवाक्याने पुढे येत आहेत.


