कळंब: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्या, दि. ८ तारखेला होणाऱ्या जिल्ह्यातील प्रचार सभांच्या पूर्वसंध्येला कळंब शहरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती तथा माजी नगरसेवक सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याला जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
शिंदे गटातील असंतोषाची ठिणगी आयात उमेदवार दिल्यामुळे लागली असून, त्याचा थेट परिणाम या पक्षांतरातून दिसून येत आहे. शिंदे गटाच्या या प्रमुख नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघात मोठी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच झालेल्या या प्रवेशामुळे आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या सभेची “हवा” काढल्याची चर्चा रंगली आहे. प्रवेश सोहळ्यात सागर मुंडे यांच्यासोबत माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफिक काझी, मनीष पुरी आदी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाला जबरदस्त धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.